जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात साकारलेल्या कोरोना प्रतिसाद कक्षातील अधिकारी संसर्गग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अधिकारी कर्मचार्यांसह त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या या कक्षातील अधिकारीच आता कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने मदतीसाठी पहावे तरी कुणाकडे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात कोरोना संसर्ग साखळी वाढतच चालली आहे. संसर्गाची सामाजिक लागण होत असल्याने परिस्थिती बिघडत चालल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर पदभार स्वीकारताच जिल्हाधिकार्यांनी प्रतिसाद कक्षाची स्थापना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन झालेल्या कक्षात जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच निवडणूक विभागातील नायब तहसीलदार यांची नेमणूक करण्यात आली होती. गेल्या दोन तीन आठवड्यांपासून या कक्षाचे काम जोरात सुरू होते. विभागीय आयुक्तालयात तसेच इतर शासकीय कार्यालयात संसर्गग्रस्त झालेल्या अधिकारी कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे काम या कक्षाकडून करण्यात येत होते. हा प्रतिसाद कक्ष असला तरी कोरोना ग्रस्तांशी संपर्क साधण्याचे महत्त्वाचे काम या कक्षाकडून केल्या गेले. पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून धीर देण्याचे कामही या कक्षातील अधिकारी कर्मचार्यांनी केले. त्यामुळे हा निव्वळ प्रतिसाद कक्ष न राहता पुढाकार घेऊन साद घालणारा कक्ष बनला. त्यामुळे अल्पावधीतच प्रतिसाद कक्ष चांगलाच लोकप्रिय ठरला होता.
अधिकारीच कोरोनाग्रस्त!
दरम्यान या कक्षाचे प्रमुख असलेल्या अधिकार्यांचा कोरोना अहवाल काल पॉझिटिव आला. त्याचबरोबर त्यांचे सहकारी नायब तहसीलदारही पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता या अधिकार्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच प्रतिसाद कक्षाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. इतर रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करत आधार देणार्या या कक्षालाच कोरोनाने ग्रासल्याने आता मदत मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे.